डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर येथील कंचनीच्या महालाजवळ दुचाकी आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात कोयाळी दहातोंडे येथील दत्तात्रय वासुदेव दहातोंडे (वय ४५) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात दुचाकीवरील एक महिलाही गंभीर जखमी झाली असून, वृत्त लिहिपर्यंत तिची ओळख समजू शकली नव्हती.
दरम्यान, दुचाकी आणि पिकअपची धडक इतकी जोरदार होती की, धडकेनंतर पिकअप वाहन रस्त्यावर उलटले, तर दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वृत्त लिहिपर्यंत या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.














