बुलढाणा (जिमाका: बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावागावांत आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियान राबविण्यात येत आहे. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ८७० ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून आपापली गावे स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत प्रत्येक गावात शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, पाणी गुणवत्ता तपासणी, पाण्याचे शुद्धीकरण, वृक्षारोपण, धूरमुक्त गाव, कचरा संकलन व वर्गीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, गावाची स्वच्छता आणि जलसंवर्धन अशा विविध उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. लोकसहभागातून गावाचे पर्यावरण स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नियमित आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.
केवळ गावाची स्वच्छताच नव्हे, तर नागरिकांचे आरोग्य सुधारण्यावरही अभियानात विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. माता व बालमृत्यू रोखणे, बालकांचे संपूर्ण लसीकरण, कुपोषित बालकांची काळजी, मधुमेह व कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची तपासणी, क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रण यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. यासोबतच मानसिक आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा, दिव्यांगांसाठी आरोग्य सुविधा, किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य आणि आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आरोग्यविषयक जनजागृती, नियमित आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करून नागरिकांमध्ये आजारांपासून बचाव करण्याची जाणीव निर्माण केली जाणार आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य यंत्रणा, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. गावकऱ्यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले गाव आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण यांनी केले आहे.
उत्कृष्ट ग्रामपंचायतींवर कोट्यवधींच्या पुरस्कारांची बरसात!
या अभियानात आरोग्य आणि विकासाच्या विविध निर्देशांकांच्या आधारे ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य आणि जिल्हास्तरावर घसघशीत पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला तब्बल ५ कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ कोटी रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी २ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५ लाख, द्वितीय क्रमांकासाठी २० लाख आणि तृतीय क्रमांकासाठी १५ लाख रुपयांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.















