मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): व्यवसायासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार मेरा खुर्द येथे समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर पैसे आणले नाही तर दुसरा निकाह करण्यासाठी संमती दे, असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार विवाहितेने दिली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या एकूण सात जणांविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंढेरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेरा खुर्द येथील राहत परवीन शेख अजीम (वय ३१) यांचा मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजानुसार वळती, ता. चिखली येथील शेख अजीम शेख अलीम यांच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीच्या काळात पती व सासरच्या मंडळींकडून त्यांना चांगली वागणूक मिळत होती. मात्र, कालांतराने त्यांच्या वागणुकीत बदल झाला.
व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून १० लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सासरच्या मंडळींकडून करण्यात येऊ लागली. पैसे आणण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर दुसरा निकाह करण्यासाठी संमती दे, असे म्हणत विवाहितेला शिवीगाळ व त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच शारीरिक व मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे विवाहितेने म्हटले आहे.
या प्रकाराला कंटाळून राहत परवीन यांनी १९ नोव्हेंबर रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पती शेख अजीम शेख अलीम यांच्यासह शेख अलीम शेख बुढण, सायराबी शेख अलीम, शेख असीम शेख अलीम, तोफीजा अंजुमखान, शायला अजीमखान आणि तनजीला बिलाल पठाण अशा सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ८५, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.












