अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पती बँकेच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना पत्नी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई येथे उघडकीस आली आहे. पत्नीचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने अखेर पतीने अंढेरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंतोष बन्सी पवार (वय ३७, रा. माहेर जवळा, ता. घनसावंगी, जि. जालना, सध्या रा. धोत्रा नंदई, ता. देऊळगाव राजा) हे १९ नोव्हेंबर रोजी बँकेच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान, सकाळी ६ ते दुपारी १.५० वाजेदरम्यान त्यांची पत्नी सविता चिंतोष पवार (वय ३४) या घरातून अचानक बेपत्ता झाल्या.
पती घरी परतल्यानंतर पत्नी घरात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर नातेवाईक व परिसरात शोधाशोध केली; मात्र त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार एपीआय रुपेश शक्करगे आणि तपास अधिकारी एएसआय मारोती कायंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी पती चिंतोष पवार यांच्या तक्रारीवरून १९ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.












