मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): घरासमोर अंगणात झाडू मारणाऱ्या महिलेला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने विनाकारण शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या महिलेच्या पतीलाही आरोपीने चाकूने मारहाण केली. एवढेच नव्हे तर मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही चाकूने वार करून जखमी केले. ही धक्कादायक घटना तालुक्यातील राजूर येथे १९ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूर येथील रहिवासी सइदाबी शेख निसार (वय २५) या १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात झाडू मारत होत्या. त्याचवेळी त्यांचा शेजारी शेख जमीर शेख गफार हा तेथून जात असताना त्याने कोणतेही कारण नसताना त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सइदाबी यांनी त्याला जाब विचारला आणि पती शेख निसार शेख गणी यांना बोलावून घेतले.
याचा राग मनात धरून आरोपी शेख जमीर याने सइदाबी यांच्या पतीसोबत झटापट केली. त्यानंतर जवळील चाकूने त्यांच्या डाव्या हाताच्या बोटावर वार करून त्यांना जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने सइदाबी यांच्या डाव्या हाताच्या मनगटावरही चाकूने वार केले. या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही जखमी झाले.
त्यानंतर आरोपीने पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी सइदाबी यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी शेख जमीर शेख गफार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५, ११२(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बळीराम खंडागळे करीत आहेत.












