Advertisement Advertisement

दुष्काळानं खिसा रिकामा केला, पण तुपकरांवरील प्रेम तसूभरही कमी झालं नाही! धानोरीत गावकऱ्यांनी डोक्यावर घेतलं; चिखली तालुक्यात गावोगावी संघर्ष यात्रेला तुफान प्रतिसाद! पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा, शेतकरी म्हणून एकत्र या! विनायक सरनाईकांची हाक; ४ डिसेंबरच्या बुलढाणा एल्गार महामोर्चासाठी गावोगावी आवाहन!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला, शेतातील पिकं वाळली, आर्थिक गणित कोलमडलं; मात्र शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावरील विश्वास आणि प्रेम आजही कायम असल्याचं चित्र चिखली तालुक्यातील गावागावांत पाहायला मिळत आहे. मलकापूरपासून सुरू झालेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेला चिखली तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेच्या सातव्या दिवशी वैरागड, उदयनगर, अमडापूर, कारखेड, पिंपरखेड, इसोली आणि धानोरी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या.

धानोरीत गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत!

धानोरी गावात संघर्ष यात्रा पोहोचताच ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. गावभर रांगोळ्या काढण्यात आल्या, घरोघरी महिलांनी औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत केले. कापूस आणि सोयाबीनच्या राशींचे रविकांत तुपकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शेतीच्या औजारांचेही पूजन करून जंगी मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे, दुष्काळामुळे आर्थिक संकट ओढवलेले असतानाही यात्रा दोन ते तीन तास उशिरा पोहोचली तरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वागतासाठी थांबून होते. शेतकऱ्यांनी दाखवलेला जिव्हाळा आणि प्रेम पाहून रविकांत तुपकर भावुक झाले, तर यात्रेतील पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भारावून गेले. यावेळी विनायक सरनाईक यांनी धानोरी ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

कर्जमाफी झाली, तरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतायत!

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांची बँकांकडूनही अडवणूक होत असल्याचा मुद्दा यात्रेदरम्यान उपस्थित करण्यात आला. कर्जमाफी होऊनही वैयक्तिक कर्जाचा बोजा दाखवून काही बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करण्यात आला. एका बाजूला शेतात उत्पन्न नाही आणि दुसऱ्या बाजूला बँकांकडून पीककर्जासाठी अडवणूक, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. बँकांची मनमानी तातडीने थांबवून शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा बँकांच्या मनमानीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

नेते स्वार्थासाठी एकत्र येतात, मग शेतकरी प्रश्नांवर का नाही?

यावेळी विनायक सरनाईक यांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीचा मुद्दा उपस्थित केला. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या विचारांचे नेते स्वतःच्या हितासाठी एकत्र आले आणि संचालक मंडळ स्थापन केले. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्यात अडचण काय, असा सवाल त्यांनी केला. नेते आपल्या हितासाठी एकत्र येऊ शकतात, तर शेतकरी आणि शेतमजुरांनीही आपल्या मातीसाठी, शेतीसाठी आणि हक्कांसाठी पक्षीय झेंडे बाजूला ठेवून एकत्र यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

४ डिसेंबरला बुलढाण्यात शेतकऱ्यांचा एल्गार!

रविकांत तुपकर जिल्ह्यासह राज्यातील विविध दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. मलकापूरपासून सुरू झालेल्या या संघर्ष यात्रेला विविध तालुक्यांतून प्रतिसाद मिळत असून, चिखली तालुक्यातील गावागावांतही शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. आता ही यात्रा मेहकर तालुक्यात दाखल झाली आहे. दरम्यान, येत्या ४ डिसेंबर रोजी बुलढाणा येथे होणाऱ्या शेतकरी एल्गार महामोर्चात पक्षीय मतभेद विसरून शेतकरी आणि शेतमजुरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या हक्कांसाठी एकजुटीने आवाज उठवून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव करून द्यावी, असे आवाहन विनायक सरनाईक यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!