Advertisement Advertisement

गावाच्या वेशीवर नाही, चक्क शेतातल्या गोठ्यातच काळा धंदा! सोनोग्राफी मशीन लावून सुरू होता गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा; पीसीपीएनडीटी पथकाने रंगेहात पकडलं!

बुलढाणा/अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुलगा-मुलगी असा गर्भाचा प्रकार तपासून देण्याच्या बेकायदेशीर धंद्याने आता चक्क शेतातील गोठ्याचाच अड्डा बनविल्याचा धक्कादायक प्रकार अमडापूर शिवारात उघडकीस आला आहे. अमडापूर ते लव्हाळा मार्गावरील एका शेतातील टीनपत्र्याच्या गोठ्यात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदानाचा अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांच्या पीसीपीएनडीटी पथकाने २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता पर्दाफाश केला. या कारवाईत शेतमालक पिता-पुत्रासह वाशीम येथील एकाला अटक करण्यात आली असून, पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणात अमडापूर येथील गणेश शंकरराव सूर्यवंशी, त्याचा मुलगा श्रेयस गणेश सूर्यवंशी आणि वाशीम येथील राहुल नामदेव इंगळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर वाशीम येथील एजंट शेख जमील याचेही नाव समोर आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अटक आरोपींकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने प्रत्यक्ष गर्भलिंग निदान करणारा बोगस डॉक्टर नेमका कोण, हा प्रश्न आता तपास यंत्रणांसमोर उभा ठाकला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून बोगस डॉक्टर आणि एजंटांची टोळी वेगवेगळ्या ठिकाणी अवैध गर्भलिंग निदान करीत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी विभागाला मिळाली होती. त्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. आरती कुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डिकॉय केस तयार करून सापळा रचण्यात आला. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पथक संशयितांचा माग काढत होते. अखेर अमडापूर ते लव्हाळा मार्गावरील गणेश सूर्यवंशी यांच्या शेतातील टीनपत्र्याच्या गोठ्यात गर्भलिंग निदान सुरू असल्याचे आढळले. डिकॉय केसच्या माध्यमातून सोनोग्राफी सुरू असतानाच पथकाने छापा टाकला. सकाळपासून सुरू असलेली ही मोहीम दुपारी दोन वाजता यशस्वी झाली.

घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. चिखली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमर सय्यद यांच्या तक्रारीवरून अमडापूर पोलिसांनी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत अकोला, बुलढाणा आणि वाशीम येथील आरोग्य विभागाचे अधिकारी, विधी सल्लागार, कर्मचारी, वाशीम स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि अमडापूर पोलिसांनी सहभाग घेतला.

स्त्रीभ्रूणहत्येला खतपाणी घालणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले!

जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा सुरू असल्याचे या कारवाईतून पुन्हा समोर आले आहे. गर्भलिंग निदानानंतर स्त्रीभ्रूणहत्येला प्रोत्साहन मिळण्याचा गंभीर धोका असून, मुलींच्या घटत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार चिंताजनक आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. मात्र, प्रशासनाच्या नजरेआड शेतातील गोठ्यांसारख्या ठिकाणी असे अड्डे चालविले जात असल्याने या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. आता या गोरखधंद्यामागचा बोगस डॉक्टर कोण आणि या रॅकेलचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचले आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!