बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज:जिमाका) :देशाच्या जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाला सुरुवात झाली असून, बुलढाणा जिल्ह्यातही जनगणनेच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सुरू झाले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे उपस्थित होते.जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात घरयादी तयार करणे आणि गणना गट निश्चित करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जाणार आहे. प्रत्यक्ष जनगणनेपूर्वी संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक प्रवीण भगत आणि सांख्यिकी अन्वेषक वर्ग-२ निहाल धरंधरे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजाची पद्धत, पूर्वतयारी आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या जनगणनेचे काम व्यापक स्वरूपाचे असल्याने मोठ्या प्रमाणात प्रगणक, पर्यवेक्षक आणि प्रशासकीय यंत्रणेची आवश्यकता भासणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा प्रशिक्षणात सहभाग आहे.
जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीकडून ४० प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार असून, त्यातून नागरिकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेतली जाणार आहे.
विशेष म्हणजे, नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन पद्धतीने माहिती भरण्याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यानंतर प्रगणक घरोघरी भेट देऊन संकलित माहितीची पडताळणी करणार आहेत. प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या संभाव्य अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि माहिती संकलनातील अचूकता याबाबतही प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले.जनगणनेचे काम अचूक, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तयारी केली जात आहे.
या प्रशिक्षणासाठी जनगणना कक्षाच्या संजीवनी मुंपडे, तहसीलदार (सामान्य प्रशासन) पी. के. करे, नायब तहसीलदार तसेच सहायक महसूल अधिकारी अपेक्षा जाधव यांनी सहकार्य केले.















