खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):कौटुंबिक वादातून जावयाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथे घडली. या घटनेत गंभीर भाजलेल्या किशोर काशीराम चोपडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, शहर पोलिसांनी पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील सुटाळपुरा भागात राहणारे किशोर काशीराम चोपडे यांची पत्नी दीपाली ही पतीशी पटत नसल्याच्या कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून माहेरी, सुटाळा खुर्द येथे राहत होती. पत्नीला भेटण्यासाठी किशोर हे २ मे रोजी सासरी गेले होते. यावेळी त्यांच्यात गोपाल बोचरे, पांडुरंग बोचरे, अजय बोचरे व पत्नी दीपाली यांच्यासोबत जोरदार वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर गोपाल बोचरे यांनी घरातील पेट्रोलची बाटली आणून किशोर यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे. त्यावेळी पांडुरंग बोचरे, अजय बोचरे व पत्नी दीपाली यांनी किशोर यांचे हात धरून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेत गंभीर भाजलेल्या किशोर यांना प्रथम खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना अकोला येथे दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही ७ मे रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
८ मे रोजी त्यांचा मृतदेह सुटाळपुरा येथील निवासस्थानी आणण्यात आला. त्यानंतर मुक्तिधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसांनी किशोर चोपडे यांच्या फिर्यादीवरून गोपाल बोचरे, पांडुरंग बोचरे, अजय बोचरे (रा. सुटाळा खुर्द) तसेच पत्नी दीपाली चोपडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.












