चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – गेल्या काही दिवसांपासून चिखली शहरासह संपूर्ण तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्ग अक्षरशः त्रस्त झाला आहे. इंधन टंचाईवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि पेट्रोल पंपचालकांमध्ये बैठका पार पडल्या असल्या, तरी त्या केवळ औपचारिकता ठरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. बैठकांनंतरही प्रत्यक्ष परिस्थितीत कोणताही बदल झाला नसून तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर अजूनही ‘जैसे थे’ स्थिती कायम आहे.
सध्या चिखली तालुक्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर वाहनांच्या आणि हातात कॅन घेऊन उभ्या असलेल्या नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. काही पंपांवर इंधन संपल्याचे फलक झळकत असल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढत आहे.
विशेष म्हणजे, सध्या खरीप हंगामपूर्व शेतीकामांचा महत्त्वाचा काळ सुरू आहे. ट्रॅक्टर, पंप, जेसीबी आणि इतर शेती अवजारांसाठी डिझेल अत्यावश्यक असताना शेतकऱ्यांना दिवसभर पंपांवर थांबावे लागत आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून ग्रामीण भागात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
“हक्काचे इंधन मिळवण्यासाठीच जर दिवसभर रांगेत उभे राहावे लागत असेल, तर शेतीकामे कधी करायची?” असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. सामान्य शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांमध्येही तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर….
केवळ शेतकरीच नव्हे, तर नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी आणि रोजंदारीवर काम करणारे नागरिकही या टंचाईमुळे होरपळून निघत आहेत. काही पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यावरून वाद, धक्काबुक्की आणि किरकोळ हाणामारीच्या घटनाही समोर आल्या आहेत. तातडीच्या वैद्यकीय कामांसाठी किंवा अत्यावश्यक प्रवासासाठी निघालेल्या नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ज्या मोजक्या पंपांवर थोडाफार साठा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सर्वपक्षीय पुढाकाराची मागणी….
स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांच्या मते, हा प्रश्न आता केवळ बैठका घेऊन सुटणारा राहिलेला नाही. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. त्यामुळे चिखली तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना, सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, ही इंधन टंचाई लवकरात लवकर दूर झाली नाही, तर नागरिकांचा वाढता रोष आंदोलनाच्या रूपाने रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता तरी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
















