Advertisement Advertisement

EXCLUSIVE:जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘महाभारत’! पाच जागांपासून एक जागेवर आलो, तरी डाळ शिजली नाही! अजितदादा गटाने शेवटी पॅनलचं रणशिंग फुंकलं!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या सतरा वर्षांपासून निवडणूक वाट आता पाहता आज त्याची सुरुवात झाली आहे! जिल्हा बँकेची निवडणूक जवळपास अविरोध होण्याच्या मार्गावर होती. “पाच गावं तर सोडा, एक इंचही जागा देणार नाही” या भूमिकेवरून सुरू झालेला तिढा अखेर बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ‘महाभारता’च्या रूपात समोर आला आहे. अविरोध निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले असताना जागावाटपावरून मतभेद झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने सहकाराच्या कुरुक्षेत्रावर रणशिंग फुंकले गेले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक जवळपास अविरोध होण्याच्या मार्गावर होती. खामगाव येथील तुळजाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून बँकेच्या हितासाठी सर्व पक्षांना जागावाटप करण्याबाबत चर्चा झाली. याच बैठकीत बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ३०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे बँकेला मोठी आर्थिक मदत मिळाल्याची कबुलीही बैठकीत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मात्र, त्यानंतर जागावाटपाची वेळ आली तेव्हा अजितदादा पवार गटाला अपेक्षित वाटा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. सुरुवातीला राष्ट्रवादी अजितदादा गटाने पाच जागांची मागणी केली. त्यानंतर चर्चेत तीन, पुढे दोन आणि शेवटी एका जागेवरही तडजोड करण्याची तयारी दर्शविण्यात आली. मात्र, शेवटच्या टप्प्यात एक जागा देण्याबाबतही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.

या घडामोडींनंतर आमदार मनोज कायंदे यांनी पुढाकार घेत ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ जाहीर केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इतर पक्षांमधील नाराज उमेदवारांनाही सोबत घेऊन लढण्याची भूमिका या गटाने घेतली आहे. सुरुवातीला नऊ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी एका उमेदवाराने सहकार पॅनलला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात आले असून, सध्या जाहीर करण्यात आलेल्या पोस्टरवर सात उमेदवारांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.

‘सुनेत्राताईंच्या शब्दालाही मान दिला नाही!

याबाबत अड. काझी यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झाल्यानंतर अजितदादा पवार यांनी बँकेला केलेल्या मदतीचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे आपल्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा होती.

“आम्ही सुरुवातीला पाच जागा मागितल्या. त्यानंतर तीन, दोन आणि शेवटी एका जागेवरही येण्याची तयारी दाखवली. मात्र, त्यानंतर एक जागा देण्याचा निर्णयही नाकारण्यात आला,” असा दावा अॅड. काझी यांनी केला.

या प्रकरणात सुनेत्राताई अजितदादा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब आणि पालकमंत्री आबा यांनीही फोनद्वारे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, त्यानंतरही सकारात्मक तोडगा न निघाल्याने अजितदादा पवार यांच्या नावाने स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे अॅड. काझी यांनी सांगितले.

अविरोध निवडणुकीसाठी सुरू झालेल्या चर्चेला जागावाटपाच्या मुद्द्यावरून अखेर तडा गेला आहे. आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलसमोर अजितदादा पवार गटाचे शेतकरी परिवर्तन पॅनल उभे ठाकल्याने निवडणुकीतील रंगत वाढली असून, सहकाराच्या या कुरुक्षेत्रात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!