Advertisement Advertisement

जिल्हा बँक निवडणुकीत देऊळगाव राजा तालुक्याची लढत रंगणार; डॉ. शिंगणे कुणाच्या पारड्यात वजन टाकणार?

देऊळगाव राजा :(बुलडाणा कव्हरेज न्युज) अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीला आता चांगलीच रंगत आली आहे. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आता देऊळगाव राजा तालुक्यातून संचालकपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे सहकार क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ११ ऑगस्ट असल्याने तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध ग्रामसेवा सोसायटी मतदारसंघातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन शिंगणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव यांच्या पत्नी मंगला जाधव, आनंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष शिलाबाई शंकरराव आरमाळ, गणेश बुरकुल, कावेरी सोनसळे तसेच बाबुराव उषा भगवान मुंडे शिरसाट यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती आहे.

डॉ. शिंगणे यांच्या भूमिकेकडे लक्ष….

देऊळगाव राजा तालुक्यातील ग्रामसेवा सोसायटी मतदारसंघावर डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा प्रभाव असल्याचे सहकार क्षेत्रात मानले जाते. त्यामुळे अंतिम टप्प्यात डॉ. शिंगणे कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात, यावर या मतदारसंघातील निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचे लक्ष आता डॉ. शिंगणे यांच्या भूमिकेकडे लागले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

महिला, ओबीसी आणि नागरी पतसंस्था मतदारसंघातही चुरस…

महिला मतदारसंघातून संजय गांधी निराधार योजनेच्या माजी सदस्या रूपाली विष्णू बनकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच बांधकाम सभापती रियाज खान पठाण यांचेही नाव उमेदवारीच्या चर्चेत आहे.

ओबीसी मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती रियाज खान पठाण आणि एल. एम. शिंगणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. नागरी पतसंस्था मतदारसंघातूनही रियाज खान पठाण यांनी आपला दावा मजबूत केला आहे.

११ ऑगस्टनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार….

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया ११ ऑगस्ट रोजी पूर्ण झाल्यानंतर देऊळगाव राजा तालुक्यातील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

सहकार क्षेत्रातील जाणकारांच्या मते, डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या देऊळगाव राजा तालुक्यात एकच प्रश्न चर्चेत आहे—‘डॉ. शिंगणे अखेर कुणाच्या पारड्यात वजन टाकणार?’

यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील लढत केवळ निवडणूक न राहता प्रतिष्ठेची आणि राजकीय ताकदीची लढत बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!