चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असतानाच चिखली तालुक्यातील कोलारा आणि वसंतनगर येथील पाणी नमुने दूषित आढळल्याचे तपासणी अहवालातून समोर आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असताना कोलारा ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत माहितीच नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. १३ ऑगस्ट रोजी मनसेच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायतीत जाब विचारल्यानंतर ग्रामस्थांसह थेट पंचायत समितीत धडक देत प्रशासनाला धारेवर धरले.
ग्रामपंचायतीत विचारले असता ‘माहितीच नाही’!
मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कोलारा ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी ग्रामपंचायत सचिव झोपे यांच्याशी गावातील दूषित पाणी आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, पाणी दूषित असल्याच्या गंभीर विषयाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला काहीही माहिती नसल्याचे समोर आल्याचा दावा मनसे पदाधिकाऱ्यांनी केला.
गावातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असूनही प्रशासन अनभिज्ञ असल्याने मनसे पदाधिकारी व ग्रामस्थ संतप्त झाले. त्यानंतर सर्वांनी पंचायत समितीकडे मोर्चा वळवला.
बीडीओंना धरले धारेवर….
पंचायत समितीत मनसेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. ग्रामपंचायत प्रशासनालाच याची माहिती नसेल, तर नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? असा आक्रमक सवाल यावेळी करण्यात आला.
कोलाऱ्यासाठी फिल्टर प्लांटची मागणी…..
कोलारा गावाची लोकसंख्या सुमारे ७ ते ८ हजार असून एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे गावात तातडीने फिल्टर प्लांट उभारण्यात यावा, तसेच तोपर्यंत नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली.
कोलारा-वसंतनगरचे नमुने दूषित…..
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत करण्यात आलेल्या पाणी तपासणीत कोलारा आणि वसंतनगर येथील पाण्याचे नमुने दूषित आढळल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
या आंदोलनात मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी सोळंकी, मनसे शहराध्यक्ष नारायण देशमुख, मधुकर ठेंग, ज्ञानेश्वर गायकवाड, अनिल गुंजाळकर, किशोर मघाडे, सिद्धेश्वर सोळंकी, अंकित इंगळे यांच्यासह मनसे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












