खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील काळेगाव परिसरात स्मार्ट मीटरच्या विरोधात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा संताप बुधवारी उफाळून आला. ढोरपगाव उपकेंद्रात तब्बल २०० स्मार्ट मीटर जमा करून ग्रामस्थांनी महावितरणच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. त्यापूर्वी स्मार्ट मीटरची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढत ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन केले.
ढोरपगाव उपकेंद्रासमोर ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. यावेळी महावितरणविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामुळे काही काळ उपकेंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बिलवाढीचा आरोप; तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा….
स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांची पूर्वसंमती, वीज वापराची वास्तविक स्थिती आणि बिलामध्ये होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही ग्राहकांना अपेक्षेपेक्षा जास्त वीजबिले आल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या संदर्भात संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. तक्रारींचे निराकरण न झाल्यानेच आंदोलनाची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘मीटर नको’ म्हणत २०० मीटर परत….
बुधवारी ग्रामस्थांनी एकत्र येत ढोरपगाव उपकेंद्रात २०० स्मार्ट मीटर जमा केले. त्याआधी काढण्यात आलेल्या प्रतीकात्मक प्रेतयात्रेतून स्मार्ट मीटरच्या विरोधातील रोष व्यक्त करण्यात आला. उपकेंद्रासमोर झालेल्या आंदोलनात शेतकरी आणि वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या तक्रारी आणि शंका दूर करण्यासाठी महावितरणने तातडीने संवाद साधून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. आंदोलनाची भूमिका आक्रमक असली तरी ग्राहकांच्या तक्रारींची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन प्रश्न सोडवणे गरजेचे असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.














