Advertisement Advertisement

POLITICAL NEWS:चिखलीच्या राजकारणात माजी आमदार राहुल बोंद्रेंचं नाव पुन्हा चर्चेत! आठवडाभरापासून माजी आमदार मतदारसंघातून गायब; काँग्रेस सोडणार का? की नुसती थील्लर चर्चा…!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दोन ते तीन महिना उलटून जात नाही तर चिखली मतदार संघात नेहमी कांग्रेस पक्षाचे माजी आमदार राहुल बोंद्रे याच नाव कुठ ना कुठ चर्चा सुरू असती, त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली तालुक्यात सध्या कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या गेल्या काही दिवसांपासूनच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

गेल्या आठवडाभरापासून  बोंद्रे मतदारसंघात दिसून आलेले नसल्याची चर्चा असून, ते नेमके कुठे आहेत, मुंबईत आहेत की दिल्ली, किंवा अन्य ठिकाणी, याबाबत नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून चहाच्या टपऱ्यांपासून राजकीय बैठकांपर्यंत त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा होत असून, प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क-वितर्क लावताना दिसत आहे.

जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा अन् आता अनुपस्थितीची चर्चा….

काही दिवसांपूर्वी माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यानंतरही ते राजकीयदृष्ट्या सक्रिय राहिले. आता मतदारसंघात त्यांची उपस्थिती दिसत नसल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चेला उधाण आले आहे.

याच पार्श्वभूमीवर बोंद्रे काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मात्र, या चर्चेला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. काँग्रेसच्या स्थानिक किंवा जिल्हास्तरीय नेत्यांकडूनही याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. तसेच राहुल बोंद्रे किंवा त्यांच्या समर्थकांकडूनही पक्षांतराबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या चर्चांकडे केवळ राजकीय तर्क-वितर्क म्हणूनच पाहिले जात आहे.

चिखलीच्या राजकारणात नेहमीच वेगळी समीकरणे….

चिखली मतदारसंघातील राजकीय समीकरणे ही नेहमीच वेगळी राहिली आहेत. येथील मतदार कोणत्याही एका पक्षाच्या विचारसरणीला कायमस्वरूपी बांधील राहतात, असे चित्र दिसत नाही. स्थानिक प्रश्न, भावनिक मुद्दे, उमेदवाराची प्रतिमा आणि ऐनवेळची राजकीय परिस्थिती यांचा निवडणुकीच्या निकालावर मोठा प्रभाव पडतो.

नगरपालिका निवडणुकांपासून विधानसभा आणि इतर राजकीय घडामोडींपर्यंत चिखलीतील मतदारांनी अनेकदा वेगवेगळे राजकीय कौल दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय वातावरणाचा अंदाज बांधणे हे नेत्यांसाठीही आव्हानात्मक ठरते.

माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष…

एकीकडे त्यांच्या संस्थेशी संबंधित कायदेशीर प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे राहुल बोंद्रे यांच्या मौनाचा अर्थ काय आणि त्यांची पुढील राजकीय दिशा कोणती, याकडे चिखलीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, बोंद्रे यांच्याकडून अधिकृत भूमिका समोर येईपर्यंत पक्षांतराच्या चर्चांबाबत निश्चित निष्कर्ष काढणे घाईचे ठरणार आहे. मात्र, सध्या कोणतीही निवडणूक नसतानाही चिखलीच्या राजकारणात राहुल बोंद्रे यांच्या नावाचीच जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र हे चिखलीच राजकारण आहे त्यामुळें काय होणार काय नाही हे येणारा काळच ठरवेल!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!