Advertisement Advertisement

शेंदुर्जनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; चार दिवसांत एकाच घरात दोनदा घरफोडी!

शेंदुर्जन (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेंदुर्जन परिसरात चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला असून, पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव भास्कर देशमुख यांच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या घरात चोरट्यांनी अवघ्या चार दिवसांच्या अंतराने सलग दोनदा चोरी केली. पहिल्या घटनेत सोन्याची पोत आणि रोख रक्कम लंपास केल्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्यांदा घरातील मौल्यवान साड्यांवर हात साफ केला. या प्रकारामुळे शेंदुर्जन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

७ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास वैभव देशमुख यांच्या आई काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरात प्रवेश केला. चोरट्यांनी पूजेच्या डब्यात ठेवलेली सुमारे १० हजार रुपये रोख रक्कम तसेच १० ग्रॅम वजनाची, ८० गहू मणी असलेली सोन्याची पोत लंपास केली.

पहिल्या चोरीनंतर अवघे चार दिवस उलटत नाहीत तोच चोरट्यांनी पुन्हा त्याच घराला लक्ष्य केले. ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे १५ ते २० हजार रुपये किमतीच्या मौल्यवान साड्या चोरून नेल्या.

एकाच घरात चार दिवसांत दोनदा चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या घराला चोरट्यांनी वारंवार लक्ष्य केल्याने पोलिसांची रात्र गस्त नेमकी कुठे आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणाचा साखरखेर्डा पोलिसांनी गांभीर्याने तपास करून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी शेंदुर्जन येथील ग्रामस्थांकडून होत आहे. सलग दोन चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्येही आपल्या घराच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!