Advertisement Advertisement

अंढेर्‍यात दोन वेगवेगळ्या घटना… दारूच्या नशेत बाईच्या घरात घुसला अन् हात धरून ओढलं; आरडाओरड होताच पळ काढला, नंतर धमकी-शिवीगाळ! अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एका घटनेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा, तर दुसऱ्या घटनेत दारूच्या नशेत घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या दोन्ही प्रकरणांत अंढेरा पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १४ वर्षीय मुलीची आजी मजुरीसाठी बाहेरगावी गेली होती. त्यावेळी मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आरोपी गणेश रवींद्र इंगळे याने घरात प्रवेश केला. त्याने मुलीचे केस धरून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, मुलीच्या कुटुंबातील एक सदस्य तेथे पोहोचला असता आरोपीने त्याच्याशी वाद घालत चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घडलेला प्रकार मुलीने आई, वडील व आजीला सांगितल्यानंतर त्यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून गणेश रवींद्र इंगळे, रा. अंढेरा याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ३३३, ३५२ तसेच पोक्सो कायदा २०१२ मधील कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत अंढेरा येथील ३२ वर्षीय विवाहित महिला घरी असताना तिचा पती गावात गेला होता. त्यावेळी आरोपींपैकी एक जण दारूच्या नशेत महिलेच्या घरात शिरला. त्याने वाईट उद्देशाने महिलेचा हात धरून तिला छातीजवळ ओढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेल्याचे सांगण्यात आले.

यानंतर महिलेचा पती घरी परतल्यानंतर तिने त्याला घडलेला प्रकार सांगितला. दोघेही आरोपींच्या घरी विचारणा करण्यासाठी गेले असता आरोपींनी महिलेला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सचिन उत्तम पवार व कुशवार्ता उत्तम पवार, दोघेही रा. अंढेरा, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३३, ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय मारोती कायंदे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!