Advertisement Advertisement

“सत्ता कुणाच्या बापाची नाही; येणारा काळ उद्धव साहेबांचाच! – जालिंदर बुधवतांचा दावा! भाजपला परतफेड करावीच लागेल -जयश्रीताई शेळके…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, वृक्षवाटप, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रुग्णांना फळवाटप, विद्यार्थ्यांना खाऊ व स्नेहभोजन अशा कार्यक्रमांचा समावेश होता. यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केंद्र सरकार व भाजपवर जोरदार टीका केली.

बुधवत म्हणाले की, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारने दिल्लीत लाठीमार केला. मात्र, विद्यार्थ्यांच्या पाठीशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे राहिले. आंदोलनाच्या दबावामुळे अखेर केंद्र सरकारला निर्णय बदलावा लागला. कुणीही सत्तेचा कायमस्वरूपी पट्टा घेऊन आलेला नसतो. येणारा काळ हा उद्धव ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा असेल.”

वाढदिवसानिमित्त बुलढाण्याचे ग्रामदैवत श्री जगदंबा देवी मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी पातळ अर्पण करून महाआरती करण्यात आली. त्यापूर्वी २४ जुलै रोजी शेतकऱ्यांना मोफत वृक्षवाटप तसेच ग्रामीण भागात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. २६ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप तसेच मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

याशिवाय बुलढाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळावा पार पडला.

कार्यक्रमाला राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने, गजानन धांडे, लखन गाडेकर, सुनील घाटे, विजय इतवारे, विजय इंगळे, गजानन उबरहंडे, प्रतीक्षा पिंपळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक लखन गाडेकर यांनी केले.

यावेळी बोलताना राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “रामाच्या नावावर राजकारण करून सत्तेत आलेल्या भाजप सरकारला अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. तरुणांच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकले असून त्यांच्या सत्तेची उलटगणती सुरू झाली आहे.”

भर पावसातही गर्दे वाचनालयाचे सभागृह शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक जोमाने संघटन मजबूत करण्याचे आवाहनही जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी यावेळी केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!