देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खर्चासाठी मागितलेले पाच हजार रुपये देण्यास असमर्थता दर्शविल्याने मुलाने आईला शिवीगाळ करून तिच्या डोक्यात वीट मारल्याची घटना पिंपळगाव चिलमखा शिवारात ११ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेत महिला जखमी झाली असून, तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना लखन भोसले (रा. संजयनगर, देऊळगाव राजा) आणि रोहन लखन भोसले हे आई-मुलगा आहेत. कंगना भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्या पिंपळगाव चिलमखा शिवारात असताना रोहनने त्यांच्याकडे खर्चासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली.
मात्र, आपल्याजवळ पैसे नसल्याचे कंगना यांनी सांगितल्यानंतर रोहनने त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तेथे पडलेली वीट उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात कंगना यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
कंगना भोसले यांच्या तोंडी तक्रारीसह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार हेडकॉन्स्टेबल संजय गोरे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, तक्रारीतील आरोपांची सत्यता पोलिस तपास आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.













