बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत २८ जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख ३० हजार ४०१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने व्यापक नियोजन पूर्ण केले असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.
जिल्हाभरात २ हजार ६९ लसीकरण बूथ उभारण्यात येणार असून मोहिमेसाठी ६ हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका व स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. बूथवरील लसीकरणानंतर वंचित राहिलेल्या बालकांना घरभेटीद्वारे पोलिओ डोस दिला जाणार आहे. यासाठी शहरी भागात पाच दिवस, तर ग्रामीण भागात तीन दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी सांगितले की, नियमित लसीकरण झालेले असले तरी प्रत्येक बालकाला पल्स पोलिओचे दोन थेंब देणे आवश्यक आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी सहकार्य करावे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी आवाहन केले की, पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणारा गंभीर आजार असून ‘दोन थेंब जीवनाचे’ या संदेशासह सर्व पालकांनी २८ जून रोजी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना जवळच्या पोलिओ बूथवर नेऊन लसीकरण करून घ्यावे.















