Advertisement Advertisement

“मृत अंगणवाडी सेविकेलाच बीएलओ मदतनीस नेमलं!; सिंदखेडराजा तहसीलच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह?

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :निवडणूक प्रक्रियेसारख्या अत्यंत संवेदनशील कामात प्रशिक्षणातील कथित गोंधळ आणि अपुऱ्या सुविधांची चर्चा सुरू असतानाच सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित दिवटे यांनी चक्क मृत्यू झालेल्या अंगणवाडी सेविकेच्या नावाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना मदतनीस म्हणून नियुक्ती आदेश काढल्याने महसूल प्रशासनाच्या पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत २४ जून रोजी सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टी येथे बीएलओंचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला तहसीलदार अजित दिवटे उपस्थित होते. मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाइन मार्गदर्शन व्यवस्थित ऐकण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे प्रशिक्षणाचा अपेक्षित उद्देश साध्य झाला का, याबाबत शंका व्यक्त होत आहे. काही कर्मचाऱ्यांनी केवळ उपस्थिती व स्वाक्षरी करून प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे दर्शविल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक बीएलओला मदतीसाठी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार तहसील कार्यालयातून नियुक्ती आदेशही जारी करण्यात आले. मात्र दुसरबीड येथील यादीतील भाग क्रमांक २५२ मध्ये एका बीएलओसाठी सहाय्यक म्हणून मृत अंगणवाडी सेविका शिवगंगा पांडुरंग साबळे यांचे नाव आदेशात असल्याचे समोर आले. या प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची चर्चा सुरू झाली आहे.

निवडणूक प्रक्रियेसारख्या जबाबदारीच्या कामात संबंधित व्यक्ती कार्यरत आहे की नाही, याची साधी पडताळणी न करता आदेश काढले जात असतील, तर इतर शासकीय कामकाजात नागरिकांना कितपत जबाबदारीने सेवा दिली जात असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत असून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच संबंधित आदेशात तातडीने दुरुस्ती करण्यात आली का आणि या निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी कोण, याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थितीची चौकशी करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी बीएलओंसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.

> टीप : या वृत्तातील आरोप व दावे उपलब्ध कागदपत्रे तसेच संबंधितांकडून व्यक्त करण्यात आलेल्या माहितीनुसार असून, याबाबत तहसील प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!