बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – नीट पेपरफुटी, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकरीविरोधी धोरणे आणि विविध जनहिताच्या प्रश्नांविरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आसूड मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी आयोजित सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका करत शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचे शोषण करणारी जुलमी सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला.
सपकाळ म्हणाले की, २०१४ च्या तुलनेत शेतमालाचे भाव घसरले आहेत, तर डिझेल, पेट्रोल, गॅस आणि खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. एक रुपयाचा पीकविमा बंद करण्यात आला असून विम्याची रक्कम मिळणेही कठीण झाले आहे. नाफेडची खरेदी बंद झाली असून सोयाबीन, ज्वारी, मका आणि कापसाला योग्य भाव मिळत नाही. या सर्व परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशातील संतपरंपरा, संविधानिक मूल्ये, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी संघर्ष करत आहेत. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन चालणार नाही, तर देश वाचवण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
‘आसूड’ हा जनतेच्या आक्रोशाचे प्रतीक
आसूड हे सरकारच्या विरोधातील जनतेच्या आक्रोशाचे प्रतीक असल्याचे सांगताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेस गांधीजींच्या सत्याग्रह आणि अहिंसेच्या विचारांची पुरस्कर्ता आहे. मात्र सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात लोकभावना व्यक्त करण्यासाठी आपल्या संस्कृतीतील प्रतीकांचा वापर करणे आवश्यक आहे. हा आसूड व्यवस्थेवर आणि सरकारच्या अपयशावर ओढण्याचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘गृहविभाग पांडू हवालदाराच्या हाती’
राज्य सरकारवर टीका करताना सपकाळ यांनी महाराष्ट्रात पांडू हवालदार गृहविभाग चालवत असल्याची खोचक टीका केली. तसेच “बुलढाण्याचे पालकमंत्री दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा” अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.
आंदोलनातूनच जिल्हाध्यक्षपदाचा समारोप : राहुल बोंद्रे
माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जिल्हाध्यक्षपदाची सुरुवात आंदोलनातून झाली आणि ११ वर्षांच्या कारकिर्दीचा समारोपही आंदोलनातून होत असल्याचा अभिमान आहे. या काळात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा अनुभव हा आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वोच्च क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, पक्ष संघटनेचे प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून प्रामाणिकपणे काम केल्याची भावना व्यक्त करत त्यांनी मुकुल वासनिक, हर्षवर्धन सपकाळ तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
सर्वांना सोबत घेऊन काम करणार : प्रकाश पाटील अवचार
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार यांनी जिल्हा काँग्रेसचा कारभार पारदर्शकपणे व सर्वांना सोबत घेऊन चालविण्याची ग्वाही दिली. जिल्ह्याची परिस्थिती व संघर्षाचे स्वरूप आपल्याला पूर्णपणे माहीत असल्याचे सांगत त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या मोर्चा व सभेला आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार राजेश एकडे, लक्ष्मणराव घुमरे, संजय राठोड, रामविजय बुरुंगले, अरविंद कोलते, स्वाती वाकेकर, हरिभाऊ रावळ, मंगला पाटील, धनंजय देशमुख, हाजी जाहेदअली खान, अनंतराव वानखेडे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाच्या आयोजनासाठी शहराध्यक्ष दत्ता काकस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.













