देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील मेहुणा राजा येथील सुपुत्र तथा भारतीय सैन्याच्या ३३ मिडीयम रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले जवान अंकुश महादेव मिसाळ यांचे जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना २६ जून रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मेहुणा राजा परिसरावर शोककळा पसरली आहे.
अंकुश मिसाळ हे भारतीय सैन्यात अत्यंत निष्ठेने आणि समर्पित भावनेने देशसेवा बजावत होते. जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. देशसेवेसाठी समर्पित आयुष्य जगणाऱ्या या जवानाच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
दिवंगत जवान अंकुश महादेव मिसाळ यांच्या पार्थिवावर आज (२९ जून) त्यांच्या मूळगावी मेहुणा राजा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी भारतीय सैन्याच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात येणार असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
















