बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जिगाव सिंचन प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती देण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी, १४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना लेखी पत्र देऊन प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याची मागणी केली.
जिगाव प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर आणि खामगाव या सहा तालुक्यांसह अकोला जिल्ह्यातील बाळापूर व तेल्हारा या तालुक्यांतील एकूण २८७ गावांमधील १ लाख १६ हजार ७७० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. तब्बल २६.०१ टीएमसी जलसाठा क्षमता असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यास परिसरातील शेतीला मोठा आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट अप्रेझल मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात ‘ई-पॅम्स’ प्रणालीद्वारे निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने झालेल्या बैठकीत स्वतः उपस्थित राहून पुढील कार्यवाहीबाबत दिशा ठरविण्यात आल्याचेही प्रतापराव जाधव यांनी नमूद केले.
दरम्यान, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागांत पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहत आहे. अशा परिस्थितीत जिगाव प्रकल्पाचे उर्वरित काम लवकर पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होण्यास मदत होईल. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षांकडेही करण्यात आली असून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निधीला लवकरात लवकर मंजुरी देऊन प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करावे, असा आग्रह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी धरला आहे.
















