Advertisement Advertisement

“जिवंत पोरीला मेलेली ठरवलं; आता पोलिसांवरच निलंबनाची कुऱ्हाड!” “गाजावाजा मोठा, तपास फसवा; एलसीबीच्या ४ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई…..

खामगाव/जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज)जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शेतशिवारात आढळलेल्या शिरविरहित मृतदेह प्रकरणात धक्कादायक वळण आले असून चुकीचा तपास करून निर्दोष पितापुत्रांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) एका पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

राजुरा शेतशिवारात सापडलेल्या शिरविरहित मृतदेहाचा उलगडा केल्याचा दावा एलसीबीने काही महिन्यांपूर्वी केला होता. या प्रकरणात शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढत तिचे वडील बापूराव कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना अटक करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी कथित मृत शिवानी कळमेकर जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण तपास प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या प्रकरणामुळे पोलिस विभागाची मोठी नामुष्की झाली असून तपासातील गंभीर त्रुटींची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तांत्रिक पुरावे आणि वस्तुनिष्ठ पडताळणी न करता घाईघाईने निष्कर्ष काढल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

आधी बदली, मग निलंबन…

या प्रकरणात एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे तसेच पोलिस अंमलदार अजित रहेमान परसुवाले, एजाज रफिक खान आणि अमोल रमेश शेजोळे यांची प्रथम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यानंतर चौकशी अहवालाच्या आधारे चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

“माहितीवर भर, तांत्रिक तपासाला बगल”…

या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास, पुरावे आणि ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण न करता केवळ मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केल्याचा आरोप आहे. त्यामुळे निर्दोष पितापुत्रांना अटक झाल्याने पोलिस यंत्रणेवर टीकेची झोड उठली आहे.

अधिकृत माहितीबाबत गोपनीयता…

निलंबनाच्या कारवाईनंतरही पोलिस विभागाकडून अधिकृत माहिती देण्याचे टाळले जात असून संपूर्ण प्रकरणाबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात आहे.

शिवानी जिवंत; प्रकरणाला नाट्यमय वळण

ज्या शिवानी कळमेकरच्या हत्येचा दावा पोलिसांनी केला होता, तीच शिवानी जिवंत समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. त्यामुळे चुकीच्या तपासाची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असून पुढे आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!