मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रामनगर परिसरातील लक्ष्मीनारायण अपार्टमेंटमध्ये घरफोडी करून तब्बल ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या तसेच पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना मेहकर पोलिसांनी अटक करत त्यांची २६ मे रोजी शहरातून धिंड काढली. या कारवाईमुळे “पोलीस के हाथ लंबे होते है” याची पुन्हा एकदा प्रचिती नागरिकांना आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये देशपालसिंग अजयपालसिंग भादा, धर्मेंद्रसिंग कालुसिंग बावरी आणि अजितसिंग राजुसिंग टाक यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हे चोरटे रामनगर येथील लक्ष्मीनारायण अपार्टमेंटमध्ये घुसले. त्यांनी एका घराचे कुलूप फोडून ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपार्टमेंटमधील रहिवाशांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पेट्रोलिंगवर असलेले पोलीस अंमलदार श्रीकृष्ण गवई आणि पोलीस चालक चिम घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपार्टमेंटच्या पायऱ्या चढून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
घटनेनंतर पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना अटक केल्यानंतर मेहकर शहरातून त्यांची धिंड काढण्यात आली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करत पोलिसांच्या धाडसी भूमिकेचे स्वागत केले.
“इतर गुन्हेगारांवरही अशीच कारवाई व्हावी”
गुन्हेगारीला आळा बसावा आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक कायम राहावा यासाठी चोरट्यांची धिंड काढण्याची कारवाई योग्य असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मात्र, केवळ चोरीच नव्हे तर इतर गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींवरही पोलिसांनी अशीच कठोर भूमिका कायम ठेवावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.













