Advertisement Advertisement

अंढेरा पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई ; दरोडेखोरांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाणे हद्दीतील हायवे रोडवरील राजवाडा ढाबा परिसरातील जंगलात व्यापाऱ्याला लुटून जवळपास ५ लाखांचा मुद्देमाल हिसकावणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला अंढेरा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून तो जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते फिर्यादीकडे सुपूर्द केला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रशेखर गुंड्या स्वामी (वय ३२, रा. शंकरनगर, वसरणी, ता. जि. नांदेड) यांनी १ मे रोजी अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, आरोपी निलेश नरेश भोसले व जॅकीचंद विरोधभाई पवार (रा. साकेगाव, ता. चिखली) यांनी फिर्यादीला रत्न व सुलेमानी हकीक खडा विक्रीस असल्याचा व्हिडिओ पाठवला होता. खडा खरेदीसाठी फिर्यादीला अंढेरा हद्दीतील हायवे रोडवरील राजवाडा ढाबा परिसरात बोलावण्यात आले.

दरम्यान आरोपी निलेश भोसले, जॅकीचंद पवार, आदित्य भोसले, राज पवार, भाऊराजा पवार व अन्य एका साथीदाराने संगनमत करून फिर्यादीला चापटा-बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीजवळील सोने, चांदी, अष्टधातूचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला.

या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१० (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून पाच जणांना अटक केली व मोठा मुद्देमाल जप्त केला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे कुंडल, चांदीचे कडे, चांदीचे ब्रासलेट, चांदीच्या पायातील बेड्या, अष्टधातूची गदा, चांदीची अंगठी, राखी, चैन तसेच ११ हजार रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!