Advertisement Advertisement

कुणी लग्नाला जाते म्हणी तर कुणी टेलरकडे गेलं… पण परत कोणीच आलं नाही!दोन दिवसांत विवाहित महिले सह तीन मुली आणि एक तरुण बेपत्ता….

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून विविध पोलीस ठाण्यांत एकामागून एक मिसिंग आणि अपहरणाचे गुन्हे दाखल होत आहेत. सिंदखेड राजा येथील एक तरुण, मलकापूर व जळगाव जामोद येथील दोन मुली, अंडेरा परिसरातील एक अल्पवयीन पीडिता तसेच लोणार तालुक्यातील एका विवाहित महिलेच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिंदखेड राजा येथील तरुण बेपत्ता….

सिंदखेड राजा तालुक्यातील खामगाव खापरखुटी येथील किरण राम चव्हाण (वय २५) हा युवक ७ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास “लग्नाला जातो” असे सांगून घरातून निघून गेला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्याचा मोबाइलदेखील बंद येत असल्याने नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही. याप्रकरणी पत्नी पुष्पा चव्हाण यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे.

किरण चव्हाण यांचा रंग गोरा, बांधा सडपातळ, उंची ५ फूट ७ इंच असून अंगात निळा शर्ट व काळी नाईट पॅन्ट असल्याचे सांगण्यात आले आहे.

मलकापूरातील १८ वर्षीय युवतीचा शोध सुरू….

मलकापूर शहरातील बेलाड येथील शुभांगी देविदास सूर्यवंशी (वय १८) ही युवती ८ मे रोजी दुपारी १२ वाजता “टेलरकडे जाते” असे सांगून घराबाहेर पडली होती. बराच वेळ उलटल्यानंतरही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. संबंधित टेलरकडे चौकशी केली असता शुभांगी तेथे आलीच नसल्याचे समोर आले.

याप्रकरणी वडील देविदास महादेव सूर्यवंशी यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मिसिंग नोंदवली आहे. शुभांगीचा रंग सावळा, उंची ५ फूट ७ इंच, गोल चेहरा असून अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस असल्याचे वर्णन देण्यात आले आहे.

जळगाव जामोद येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा…..

जळगाव जामोद तालुक्यातील खेलपूर शेतशिवारात १६ वर्षीय अनिता ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी जगदीश जामसिंग डावर व त्यांची पत्नी लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांनी मुलगी अनिताला भावाच्या घरी ठेवले होते.

दरम्यान, ५ मे रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान अनिता घरातून बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अनिताचा रंग निमगोरा, उंची ४ फूट ६ इंच, बांधा सडपातळ असून अंगात जीन्स पॅन्ट व टॉप असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोणार तालुक्यातील विवाहित महिला बेपत्ता…..

लोणार तालुक्यातील पिंपळखुटा येथील वर्षा ज्ञानेश्वर मापारी (वय २५) या विवाहित महिला ८ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास “साडीला फॉल लावून आणते” असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्यासोबत काही साड्या, तीन हजार रुपये रोख रक्कम व अँड्रॉइड मोबाइल होता.

मात्र त्या घरी परतल्या नाहीत. त्यांचा मोबाइलही बंद येत असल्याने पती ज्ञानेश्वर भागवत मापारी यांनी लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मिसिंग दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

वर्षा मापारी यांचा रंग सावळा, उंची ५ फूट, लांब काळे केस असून अंगात चॉकलेटी रंगाची साडी असल्याचे वर्णन देण्यात आले आहे.

अंढेरा परिसरातील अल्पवयीन पीडिताही बेपत्ता….

अंडेरा मेरा बुद्रुक परिसरातील एका अल्पवयीन पीडितेच्या बेपत्ता होण्याची घटनाही समोर आली आहे. पीडितेची आई ३ मे रोजी कामानिमित्त बाहेर गेली होती. सायंकाळी घरी परतल्यानंतर मुलगी घरात आढळून आली नाही. नातेवाईक व परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार भरत पोफळे करीत आहेत.

दरम्यान, या सर्व घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित व्यक्तींबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!