देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :तालुक्यातील देऊळगाव येथील २५ वर्षीय युवक अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण बाबुराव शिंगणे (वय ६०, रा. देऊळगाव मही) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा संतोष लक्ष्मण शिंगणे (वय २५) हा दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. त्यानंतर तो अद्यापपर्यंत घरी परतलेला नाही.
या प्रकरणी त्याच दिवशी सायंकाळी ५:१३ वाजता कायम मिसिंग नं. १०/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार विश्वनाथ काकड यांनी नोंदवून पुढील तपास पोलीस हवालदार कलीम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
बेपत्ता युवकाची उंची सुमारे ५ फूट ५ इंच असून रंग सावळा व बांधा सडपातळ आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात चप्पल व गळ्यात तुळशीची माळ अशी त्याची वेशभूषा आहे.
अशा वर्णनाचा युवक कुठेही आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.













