Advertisement Advertisement

चिखलीत स्वच्छतेचा बोजवारा; नगरपालिका फक्त आश्वासनापुरतीच? घंटा गाडी आठ आठ दिवस दिसत नाही? नगरपालिका झोपली का?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)“स्वच्छ चिखली, सुंदर चिखली” असा नारा देणाऱ्या नगरपालिकेच्या कारभारावर आता नागरिकांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शहरातील अनेक भागांत सध्या कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत असून, स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यांवरच घाण साचलेली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

शहरातील विविध भागांत पडलेल्या कचऱ्यावर गायी व इतर जनावरे अन्न शोधताना दिसत आहेत. यामुळे अस्वच्छतेबरोबरच आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण झाला आहे. “निवडणुकीच्या वेळी मोठमोठी आश्वासने देणारे प्रतिनिधी आता कुठे गेले?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. नगरपालिका निवडणुकीत दिलेली स्वच्छतेची आश्वासने केवळ बोलघेवडी ठरल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.

शहरातील पाटबंधारे विभागाच्या रस्त्यावर, जलशुद्धीकरण केंद्राजवळील मोकळ्या जागेत तसेच बुलढाणा रोडवरील नदी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला असून, तो अद्यापही साफ करण्यात आलेला नाही. याशिवाय, काही गल्ल्यांमध्ये घंटागाड्या आठ-आठ दिवस फिरकत नसल्याने नागरिक कचरा पिशव्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला टाकत असल्याचे चित्र आहे.

शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या नगरपालिकेने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नागरिकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!