किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): दुसरबीड शिवारातून रात्रीच्या अंधारात शेळ्या चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा किनगाव राजा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला. या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीतील सात शेळ्या, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि तीन मोबाईल असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. भाग्यश्री संतोष खंदारे (वय ३५, रा. दुसरबीड) यांच्या दुसरबीड शिवारातील मांडवा धरणाजवळील शेतातील गोठ्याच्या मोकळ्या जागेतून १८ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी लहान-मोठ्या शेळ्या व पिल्लांसह एकूण आठ शेळ्या, अंदाजे ७५ हजार रुपये किंमतीच्या, चोरून नेल्या होत्या.
या प्रकरणी भाग्यश्री खंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगाव राजा पोलिसांनी गुन्हा क्र. २६४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा बाजार येथे चोरीतील शेळ्या आणि आरोपी असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अर्जुन पांडुरंग राठोड (रा. जवळा बाजार), स्वप्नील रावसाहेब ढगे (वय २०, रा. जऊळका) आणि आदित्य सुभाष भोसले (वय २१, रा. डोणगाव) या तिघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी दुसरबीड शिवारातून शेळ्या चोरून जवळा बाजार येथे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील सात शेळ्या, गुन्ह्यात वापरलेली कार आणि तीन मोबाईल असा एकूण ३.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या शेळ्या फिर्यादी भाग्यश्री खंदारे यांच्या ताब्यात देण्यात आल्या.
या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. विष्णू मुंढे, पो.कॉ. गणेश वारकरी, पो.कॉ. विजेता पवार आणि पो.कॉ. प्रशांत जायभाये हे करीत आहेत.












