रुईखेड मायंबा (बुलडाणा कव्हरेज न्यूज)बुलढाणा तालुक्यातील धाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच चोरीच्या मालाची खरेदी-विक्री रोखण्याच्या उद्देशाने धाड पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान परिसरातील भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या तीन दुकानांची झडती घेण्यात आली.
तपासणीदरम्यान पोलिसांना सुमारे ९ हजार रुपये किमतीचा संशयास्पद मुद्देमाल आढळून आला. यामध्ये विविध प्रकारचे पाण्याचे पंप, मोटार स्टार्टर, तांब्याची वायर, सायकल, पंखा, स्टीलची भांडी, इलेक्ट्रिक केबल, बॅटऱ्या तसेच लोखंडी पाईप आदी साहित्याचा समावेश आहे.
संबंधित भंगार व्यावसायिकांना जप्त साहित्याच्या मालकीची वैध कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या असून, समाधानकारक कागदपत्रे सादर न केल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे धाड पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
धाड पोलिसांची ही मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असून, चोरीच्या मालाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.













