बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :लग्नाचं स्वप्न दाखवायचं, वर्षानुवर्षे विश्वास संपादन करायचा आणि ऐनवेळी दुसरीशी लग्न करून तरुणीला वाऱ्यावर सोडायचं, असा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरातील सागवन परिसरात उघडकीस आला आहे. तब्बल १७ वर्षे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा, त्यानंतर परस्पर दुसऱ्या मुलीशी विवाह केल्याचा आणि जाब विचारताच जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सागवन परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणीची संबंधित तरुणासोबत २००८ मध्ये ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. दोघांनीही लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचे ठरविल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, २००९ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तब्बल सतरा वर्षे लग्नाच्या आशेवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणीला आरोपीच्या वागण्यामुळे मोठा धक्का बसला.
दरम्यान, पीडितेला कोणतीही कल्पना न देता आरोपीने दुसऱ्या मुलीशी विवाह केल्याचे समोर आले. याबाबत तरुणीने जाब विचारला असता आरोपीने कथितरीत्या अपमानास्पद भाषा वापरत जातीवाचक शिवीगाळ केली. ‘तुला जे करायचे ते कर’, अशी धमकी देत दमदाटी केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.
लग्नाच्या आमिषाच्या तक्रारींची चर्चा….
लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून समोर येत असताना, बुलढाणा शहरातील या घटनेने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. सतरा वर्षांच्या संबंधानंतर दुसऱ्या मुलीशी विवाह केल्याचा आरोप आणि त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. आता पोलीस तपासातून या प्रकरणातील नेमके वास्तव समोर येणार आहे.














