देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गोवंशीय जनावरांची अमानुष आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी जोरदार धडक कारवाई केली आहे. देऊळगावमही ते खैरव रोडवर पहाटेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सहा वाहनांमधून निर्दयतेने कोंबून नेली जाणारी तब्बल ४४ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून सहाही वाहने जप्त केली आहेत. या कारवाईने अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे २.१५ वाजताच्या सुमारास देऊळगावमही ते खैरव रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी सहा वाहनांमधून ४४ गोवंशीय जनावरांची वाहतूक करीत होते. विशेष म्हणजे, जनावरांना वाहनांमध्ये अत्यंत निर्दयतेने कोंबण्यात आले होते. तसेच त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती आणि वाहतुकीसाठी आवश्यक परवानगीही घेण्यात आली नव्हती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने या जनावरांची सुटका झाली.
या प्रकरणी पोलीस शिपाई प्रवीण डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून शेख शब्बीर शेख शौकत, अब्दुल रहेमान शेख नजीर, शेख नूर महमंद शेख करीम, भास्कर मुरलीधर उगलमुगले (सर्व रा. देऊळगावमही), निखील रमेश पांडे (रा. संजयनगर, देऊळगाव राजा) आणि शेख शाहरुख शेख फारुख (रा. करीमनगर, देऊळगाव राजा) या सहा जणांविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देणे अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर करीत आहेत.
देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कारवाया सुरू आहेत. गेल्या महिन्यातही पोलिसांनी मोठी धडक कारवाई करीत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर आता गोवंशीय जनावरांच्या अवैध आणि निर्दयी वाहतुकीविरुद्ध केलेल्या या कारवाईने पुन्हा एकदा अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.













