चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील उदयनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. बिअरने भरलेल्या भरधाव मालवाहू ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काळी-पिवळी वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, काळी-पिवळी थेट रस्त्यालगत असलेल्या हनुमान मंदिरावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात ट्रकचालक आणि हेल्पर अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रात्री एक वाजेच्या सुमारास घडली.
या अपघातात गणेश गणपतजी कातमाल (वय ३८) आणि निलेश रामभाऊ मडकाम (वय २८), दोघेही रा. शिलेवाडा, खापरखेडा, नागपूर येथील रहिवासी, यांचा मृत्यू झाला. बिअरची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकने उभ्या वाहनाला धडक दिल्यानंतर झालेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली.
रस्त्याच्या कडेला उभी असलेली काळी-पिवळी थेट हनुमान मंदिरापर्यंत जाऊन आदळल्याने धडकेची भीषणता स्पष्ट झाली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने उदयनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला? ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले की अन्य काही कारण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच समोर येणार आहे.















