Advertisement Advertisement

हिवरा आश्रम-मेहकर रस्त्यावरील जीवघेण्या भेगांविरोधात युवकाचे अर्धनग्न आंदोलन….

हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज) : हिवरा आश्रम ते मेहकर या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठमोठ्या जीवघेण्या भेगा पडलेल्या आहेत. या भेगांमुळे अनेक दुचाकी अपघात घडले असून काहींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

युवासेनेचे अमोल पाटील म्हस्के यांनी यापूर्वी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावरील भेगा तातडीने बुजविण्याची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.

अखेर जनहितासाठी अमोल पाटील म्हस्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नागझरी बु. गावाजवळ मुख्य रस्त्यातील भेगांमध्ये बसून अर्धनग्न आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला परिसरातील नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शविला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रोज अपघात होत असल्याने वाहनधारकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आंदोलनादरम्यान अमोल पाटील म्हस्के यांनी संबंधित विभागाचे अधिकारी चव्हाण साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. “जोपर्यंत भेगा बुजवल्या जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी चव्हाण साहेब यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत दोन ते तीन दिवसांचा अवधी मागितला व गुरुवारपर्यंत शंभर टक्के भेगा बुजविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर अमोल पाटील म्हस्के यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, गुरुवारपर्यंत काम पूर्ण झाले नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात अमोल पाटील म्हस्के, छगन म्हस्के, सचिन काटे, विनोद आखरे, अनिल कांबळे, विजय चव्हाण, सचिन सरकटे, गटलू नवघरे, गजानन देवकर, प्रशांत मगर, बाळू काळे यांच्यासह नागझरी बु. गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, योगायोगाने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांनीही संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर नाराजी व्यक्त केली. “इतक्या मोठ्या भेगा पडूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे, ही गंभीर बाब आहे. तातडीने दुरुस्ती न झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीनेही तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!