खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नाचे आमिष दाखवत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने खळबळ उडाली असून आरोपी नरेश दिनकर बोके (वय २३) याच्याविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी मूळची इंदूर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून २१ मे २०२५ ते १२ एप्रिल २०२६ या कालावधीत अत्याचार झाल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे इंदूर ते डोलारखेड (ता. शेगाव) असा दोन राज्यांपर्यंत या गुन्ह्याचे धागेदोरे समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पीडितेच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे जलंब पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२), ६४(२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे करीत आहेत.
अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून अल्पवयीन मुलींना फूस लावून गुन्हे घडवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. शिकण्याच्या वयात मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही घटना समाजासाठी धोक्याची घंटा ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.














