Advertisement Advertisement

लाखोंची इमारत बांधली, पण डॉक्टरांचाच पत्ता नाही! बीबीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मुक्या जनावरांचे हाल, पशुपालकांचा संताप!

बीबी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बीबी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचा आरोप पशुपालकांकडून केला जात आहे. पशुवैद्यकीय अधिकारी नियमितपणे दवाखान्यात हजर राहत नसल्याने परिसरातील पशुधनाला वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आजारी जनावरांना घेऊन पशुपालकांना खासगी पशुवैद्यांकडे धाव घ्यावी लागत असून, आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांच्या जनावरांना वेळेवर उपचार मिळावेत, पशुपालनातून कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने बीबी येथे लाखो रुपये खर्च करून स्वतंत्र पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभारण्यात आली. मात्र, अधिकारीच नियमित हजर राहत नसल्याचा आरोप होत असल्याने या दवाखान्याच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे जनावरांना उपचारांची गरज असताना दुसरीकडे दवाखान्यात अधिकारी मिळत नसल्याने पशुपालकांची चांगलीच गैरसोय होत आहे.

केवळ अधिकारी उपस्थित राहत नसल्याचीच समस्या नाही, तर लाखो रुपये खर्चून उभारलेल्या दवाखान्याच्या इमारतीची आणि परिसराचीही दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. शासकीय निधीतून उभारलेल्या या सुविधेची देखभाल आणि नियमित कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या संदर्भात प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या अडचणींबाबत आयुक्तांकडे दाद मागण्यास सांगितले. त्यानंतर सहाय्यक आयुक्त डॉ. रायबोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नियमित उपस्थित राहण्याचे तोंडी निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.

आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडी निर्देशानंतर तरी बीबीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार सुधारणार का? पशुपालकांना वेळेवर उपचार मिळणार का आणि दवाखान्याच्या इमारतीची दुरवस्था दूर होणार का, असा सवाल परिसरातील पशुपालकांकडून उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ पशुसंवर्धन विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन दवाखान्यात नियमित सेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!