देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरालगतच्या जंगलात दोन ट्रक भरून मसाल्याची पाकिटे उघड्यावर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जंगलात आढळलेल्या पाकिटांवर ‘जेएसएम’ आणि ‘अम्माजी फूड स्पाइसेस’ अशी नावे छापलेली आहेत. विशेष म्हणजे, या पाकिटांमध्ये कांदा-लसूण मसाला आणि मिरची पावडरचा समावेश असून, मसाल्याची मुदत संपलेली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दोन ट्रक भरून एवढ्या मोठ्या प्रमाणात मसाल्याचा साठा जंगलात कोणी आणि नेमका कशासाठी फेकून दिला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या साठ्याची नेमकी किंमत किती आहे, याबाबतही अद्याप स्पष्टता झालेली नाही. जंगलात फेकलेल्या मसाल्याच्या पाकिटांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, या घटनेच्या दोन दिवस आधीच अन्न व औषध प्रशासनाने पिंपळनेर शिवारातील दोन मसाला व्यावसायिकांच्या आस्थापनांवर छापा टाकला होता. या कारवाईत अंदाजे ६० लाख ते एक कोटी रुपयांचा मसाल्याचा साठा जप्त करून संबंधित आस्थापनांना सील करण्यात आले होते. त्यामुळे जंगलात आढळलेल्या मसाल्याच्या साठ्याचा या कारवाईशी काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित झाला होता.
मात्र, जंगलात फेकून दिलेला मसाल्याचा साठा आणि पिंपळनेर शिवारातील सील केलेला साठा वेगवेगळा असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त प्रमोद पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच जंगलात आढळलेल्या पाकिटांबाबत संबंधित उत्पादक कंपनीला विचारणा करण्यात येणार असून, कंपनीला नोटीस बजावून खुलासा मागविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दोन ट्रक मसाला जंगलात फेकण्यामागचं नेमकं गौडबंगाल काय? मुदत संपलेला मसाला जंगलात कोणी आणून टाकला, त्याची विल्हेवाट नियमानुसार लावली होती का आणि या प्रकारामागे नेमके कोण आहे, याचा तपास आता अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीतून समोर येणार आहे. या प्रकरणातील पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.














