बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आता जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या सन २०२६-२७ च्या सुधारित पैसेवारीतूनही शेतीची दयनीय अवस्था समोर आली आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ४२० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली असून, एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या वर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी अवघी ४२ पैसे नोंदविण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बुलढाणा तालुक्यातील ९८, चिखली १४४, देऊळगाव राजा ६४, मेहकर १६१, लोणार ९१, सिंदखेड राजा ११४, मलकापूर ७३, मोताळा १२०, नांदुरा ११२, खामगाव १४६, शेगाव ७३, जळगाव जामोद ११९ आणि संग्रामपूर तालुक्यातील १०५ गावांचा यात समावेश आहे. या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तालुकानिहाय सरासरी पैसेवारी पाहता बुलढाणा तालुका ३१ पैशांसह सर्वात खालच्या स्तरावर आहे. चिखली ४०, देऊळगाव राजा ४२, मेहकर ४५, लोणार ४६, सिंदखेड राजा ४२, मलकापूर ४६, मोताळा ४६, नांदुरा ३८, खामगाव ४१, शेगाव ४६, जळगाव जामोद ४३ आणि संग्रामपूर ४६ पैसे अशी नोंद झाली आहे.
या सुधारित पैसेवारीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची परिस्थिती किती बिकट आहे, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या पुढे नसल्याने शेतकऱ्यांच्या संकटाची तीव्रता अधोरेखित झाली आहे. आता या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि शासनाच्या मदतीचा दिलासा कधी मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
याबाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी दिली.













