Advertisement Advertisement

भीषण अपघात..! कर्तव्यावर जात असलेल्या एसटी चालकाचा बोलेरोच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; बुलडाणा शहरातील घटना…

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): कर्तव्यावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या एसटी चालकाचा भरधाव बोलेरोच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (३ जुलै) सकाळी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकानजीक हिरोळे पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात रमेश सर्जेराव उबरहंडे (वय ५६) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एसटी कर्मचारी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मूळचे पांग्री उबरहंडे येथील रहिवासी असलेले रमेश उबरहंडे हे बुलढाणा आगारात चालक म्हणून कार्यरत होते. सध्या ते सागवन परिसरातील धाड नाक्याजवळ वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता एमएच-२८-बीडी-२३३४ क्रमांकाच्या स्कुटीने ते बुलढाणा आगारात कर्तव्यावर हजर होण्यासाठी निघाले होते. त्यांची त्या दिवशी बुलढाणा–मेहकर बसवर चालक म्हणून ड्युटी होती.

दरम्यान, जयस्तंभ चौकाजवळील हिरोळे पेट्रोल पंपासमोर एमएच-२८-बीबी-३४३० क्रमांकाच्या बोलेरो वाहनाचा चालक अनिल बाळू बरडे (रा. जुना गाव, भीलवाडा) याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर रमेश उबरहंडे हे बोलेरोच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी मृताचे पुत्र अनिकेत रमेश उबरहंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोलेरो चालक अनिल बाळू बरडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित हिवाळे पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!