Advertisement Advertisement

सरसकट कर्जमुक्तीची निर्णायक लढाई आज! रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आज होणार; एक दिवस थांबण्याची सरकारची तुपकरांना विनंती केली! कालचे आंदोलन ट्रेलर होता, आज गंडवागंडवी केली तर महागात पडेल!” तुपकरांचा सरकारला इशारा…

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत उभारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर सरकारला चर्चेच्या टेबलावर यावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी दुपारी ४ वाजता बैठक निश्चित झाल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र ही बैठक आता एक दिवस पुढे ढकलण्यात आली असून आता ती शुक्रवार, १० जुलै रोजी म्हणजे आज सकाळी होणार आहे. बैठकीला आणखी एक दिवसाची मुदत देण्याची विनंती सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याकडे केली. त्यानंतर तुपकर यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा देत, “कालचे आंदोलन हा फक्त ट्रेलर होता. आज सरकारने गंडवागंडवी केली किंवा सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर पिक्चर दाखवून देऊ,” असे सांगितले.

मुंबईतील विधानभवनावर धडक, सातबाऱ्यांचा वर्षाव, सोयाबीन-कापूस उधळून केलेले आंदोलन, त्यानंतर तुपकरांसह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेणे, मंत्रालयासमोरील झाडांवर जीवाची बाजी लावून सुरू झालेले आंदोलन आणि मरीन ड्राईव्हवर शेतकऱ्यांनी समुद्रात उतरून केलेला संघर्ष या सलग घटनांमुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. या आंदोलनाच्या तडाख्यानंतर सरकारने मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले; मात्र नियोजित वेळेत बैठक होऊ न शकल्याने पुन्हा एकदा सरकारने वेळ मागितला आहे. सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधून रात्री उशिरा बैठक घेण्यापेक्षा शुक्रवारी सकाळी सविस्तर बैठक घेऊ, आजचा दिवस थांबा, अशी विनंती केली. त्यावर तुपकर यांनी, “एवढे दिवस थांबलो, आणखी एक दिवस थांबू. मात्र उद्या सरसकट कर्जमुक्ती आणि पीकविमा या प्रमुख मागण्यांवर बैठक झाली नाही किंवा सरकारने फसवाफसवी करण्याचा प्रयत्न केला, तर सरकारला ते महागात पडेल ,” असा इशारा दिला.तुपकर म्हणाले, “आजचे आंदोलन हा फक्त ट्रेलर होता. उद्या सरकारने गंडवागंडवी केली, तर महाराष्ट्राला आंदोलनाचा खरा पिक्चर दाखवून देऊ.”

दरम्यान, गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून रविकांत तुपकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात ठेवले आहे. बैठक उद्यावर ढकलण्यात आल्याने तुपकरांचा आजचा मुक्काम आझाद मैदान पोलीस ठाण्यातच होण्याची शक्यता आहे.आता राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष शुक्रवारच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रविकांत तुपकर यांच्या बैठकीकडे लागले आहे. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतकरी सन्मान निधी, शेतमालाला हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत सरकार कोणती भूमिका घेते, यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे संकेत रविकांत तुपकर यांनी दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!