Advertisement Advertisement

बोगस सोयाबीन बियाण्यांविरोधात शिवसेनेचा कृषी विभागाला घेराव; दोषींवर कठोर कारवाईची मागणी….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात बोगस व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर घेराव घालण्यात आला. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहरप्रमुख श्रीराम झोरे, शहर संघटक प्रीतम गैची आणि युवासेना शहरप्रमुख आनंद गैची यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

निवेदनात म्हटले आहे की, काही कृषी सेवा केंद्रांमार्फत नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट व निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे विकले जात असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी संकटात सापडत असल्याने कृषी विभागाने तातडीने धडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेनेने बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची सखोल चौकशी करून त्यांच्याकडील साठा जप्त करावा, संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच तालुका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि सर्व कृषीसेवकांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर शिवसेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

या आंदोलनात अशोक राजपूत, लालसिंग मोरे, सखाराम पाटील, राहुल मिसाळ, हरी इंगळे, छगन वानखेडे, निवृत्ती घुबे, शुभम वानखेडे, समाधान जाधव, रवी पेठकर, पूंजाजी शेळके, अनिल जावरे, सोहेल शहा, नारायण वाणी, अशोकराव मोहिते, दिनकर मोरे, गजानन डुकरे, लक्ष्मण इंगळे, राजू इंगळे, अंकुश इंगळे, संजय कदम, प्रदीप सपकाळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!