अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंत्री खेडेकर येथील शाळेतील शिपाई विजय मोरे (वय ४५) आणि पाडळी शिंदे येथील दिनकर उर्फ दिनेश दामोदर शेळके (वय ४९) हे दोघेही घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले असून, त्यांच्या पत्नींच्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे. या घटनांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंत्री खेडेकर येथील संगीता विजय मोरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांचे पती विजय मोरे हे गावातील हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संस्थेकडून सुमारे ६० हजार रुपये मानधन मिळते. त्याचबरोबर ते व्याजाने पैसे देण्याचे तसेच सावकारांच्या मध्यस्थीने आर्थिक व्यवहार करण्याचे कामही करत होते. त्यांनी आठ दिवसांपूर्वी दोन महिन्यांचा पगार काढून घेतला होता.
५ मे रोजी सकाळी ते शाळेत झाडांना पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, पाडळी शिंदे येथील विद्या दिनकर शेळके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे पती दिनकर उर्फ दिनेश दामोदर शेळके हे २ मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी आंघोळ करून देवपूजेसाठी घराबाहेर गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु ते कुठेही आढळून आले नाहीत.
या दोन्ही बेपत्ता इसमांबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ अंढेरा पोलीस स्टेशन किंवा संबंधित गावातील नातेवाईकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.












