Advertisement Advertisement

देऊळगाव राजात लाखोंच्या कांदा बियाणे चोरीचा पर्दाफाश; ३ आरोपी जेरबंद, ५.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शहरातील पिंपळनेर परिसरातील उद्योगातून चोरीस गेलेल्या लाखो रुपयांच्या कांदा बियाणे प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अखेर छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेले कांदा बियाणे, दोन मोटारसायकली आणि तीन मोबाईल असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळनेर येथील जूजूजी मायोमास ब्रिकेट इंडस्टी येथे प्रक्रिया करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कांदा बियाण्यांच्या १४ बॅगा अज्ञात चोरट्यांनी २४ मेच्या मध्यरात्री ते २५ मेच्या पहाटेदरम्यान चोरून नेल्या होत्या. या चोरीत ६ क्विंटल ६५ किलो कांदा बियाणे लंपास करण्यात आले असून त्याची किंमत ४ लाख ६५ हजार ५०० रुपये इतकी होती.

याप्रकरणी फिर्यादी मोहम्मद अझहर मोहम्मद कलंदर (वय ३६, रा. भाजीमंडी, देऊळगाव राजा) यांनी २ जून रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

या गंभीर चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.

तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध धागेदोरे तपासत पोलिसांनी जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत शोधमोहीम राबवली. त्यानंतर १३ जून रोजी पोलिसांनी धडक कारवाई करत अंकुश तेजराव खंदारे (वय ४०, रा. सातगाव, ता. भोकरदन, जि. जालना), विनोद विठ्ठल काळे (वय २९, रा. लोणगाव, ता. भोकरदन, जि. जालना) आणि भानुदास उर्फ राहुल बाबुराव गायकवाड (वय ३२, मूळ रा. देऊळगाव राजा) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडून ५ क्विंटल ३६ किलो कांदा बियाणे, दोन मोटारसायकली आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!