Advertisement Advertisement

“लाचेच्या पाच हजारांसाठी बीट जमादार जाळ्यात! किनगाव जट्ट बसस्थानकावर एसीबीची धडाकेबाज कारवाई! पोलीस कोठडीची मुदत न वाढविणे व तपासात मदत करण्यासाठी मागितली होती लाच….

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) :बिबी पोलिस ठाण्यातील बीट जमादाराला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट बसस्थानक परिसरात सोमवारी (२८ जुलै) ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणातील आरोपी सतीश रामभाऊ नागरे (वय ४०, रा. जळूळका, ता. सिंदखेडराजा) हे बिबी पोलिस ठाण्यात हेडकॉन्स्टेबल तथा बीट जमादार म्हणून कार्यरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भाऊ व पुतण्याविरुद्ध बिबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आरोपींची पोलीस कोठडी वाढवू नये तसेच तपासात मदत करावी, यासाठी नागरे यांनी सहा ते सात हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी २८ जुलै रोजी करण्यात आली. त्यावेळी नागरे यांनी सहा हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याचा दावा एसीबीने केला आहे.

यानंतर किनगाव जट्ट बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने नागरे यांना रंगेहात ताब्यात घेतले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि बुलढाणा विभागाचे उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे व त्यांच्या पथकाने केली.

दरम्यान, कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!