खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्यूज): ग्रामपंचायतीच्या कारभारातील पारदर्शकतेचा मुद्दा आता पेटला आहे. खामगाव तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात आणि विकासकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
गावातील पांढरे बंधूंच्या नेतृत्वात २९ जुलै पासून हे उपोषण गवंढाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे सुरू आहे. आज उपोषणाचा ३ रा दिवस आहे.मात्र आतापर्यंत संबंधित प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नाही. उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी आहे की, ग्रामपंचायतीतील सर्व विकासकामे, आर्थिक व्यवहार, खर्चाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
माहिती अधिकार कायद्या अंतर्गत मागवलेली माहिती वेळेत न देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रथम अपील प्राधिकाऱ्याने नियमानुसार कारवाई करावी. चौकशी पूर्ण करून दोषींवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. ग्रामसभेच्या कामकाजाची चौकशी करून दोषींवर कारवाई, आर्थिक व्यवहार, विकासकामांचे कागदपत्रे, मोजमाप पुस्तिका, बिले, व्हाउचर्स इतर अभिलेख नागरिकांना तातडीने उपलब्ध करून द्यावेत.
गावाच्या विकासासाठी भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी सुरू असलेल्या या उपोषणाकडे आता संपूर्ण खामगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे. संबंधित प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी गवंढाळा येथील गावकरी करीत आहेत.















