पांढरदेव (बुलढाणा कव्हरेज न्यूज): ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेत पांढरदेव येथील युवा लोकनियुक्त सरपंच चेतन रामकृष्ण म्हस्के यांना “आदर्श सरपंच” या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
धुळे येथे २ ऑगस्ट २०२६ रोजी नॅशनल ह्युमन राईट अँड अँटी करप्शन सोशल जस्टिस फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.
ग्रामपंचायत पांढरदेवच्या विकासासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले नियोजन, लोकाभिमुख प्रशासन आणि विकासाची दूरदृष्टी याची दखल घेत चेतन म्हस्के यांची “आदर्श सरपंच” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या पुरस्कारामुळे पांढरदेव गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, गावातील नागरिकांनी तसेच विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. म्हस्के यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांनाही समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.














