Advertisement Advertisement

धक्कादायक प्रकार..! चोर पोहचले स्मशानभूमीत;अंत्यसंस्कारानंतर चितेची राखच चोरीला…

जालना (बुलढाणा कव्हरेज न्युज): जालना जिल्ह्यातील वरुड बुद्रुक गावात अंत्यसंस्कारानंतर चितेची राख चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी नातेवाईक अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत गेले असता, चितेची राख विखुरलेली व मोठ्या प्रमाणात गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकाराबाबत संशय व्यक्त करण्यात आला.

अंत्यसंस्कारावेळी मृतदेहासोबत असलेले सोन्याचे दागिने किंवा इतर मौल्यवान धातू मिळविण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तींनी चितेची राख उकरून हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, परिसरातील संशयित हालचालींची माहिती संकलित केली जात आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दोषींना लवकरच शोधून काढण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले असून, स्मशानभूमी परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!