बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित खामगाव–जालना १६२ किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाच्या कामाला आता मोठा वेग आला आहे. या प्रकल्पासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, चिखली, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या पाच तालुक्यांतील ५४ गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून जमीन संपादन प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्र सरकारने २६ मे २०२६ रोजी या रेल्वे प्रकल्पाची विशेष अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, रेल्वे कायद्याच्या तरतुदीनुसार ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाणार आहे.
या कामासाठी बुलढाणा येथील विशेष भूसंपादन अधिकारी तसेच खामगाव, बुलढाणा आणि सिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी जमिनीचे सर्वेक्षण, मालकी हक्कांची पडताळणी, बाधित शेतकरी व जमीनधारकांची माहिती निश्चित करणे, मोबदला ठरविणे तसेच हरकतींवर सुनावणी घेऊन नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करतील. प्रत्येक बाधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी शेगाव तालुक्यातील २, खामगावमधील १३, चिखलीतील २०, सिंदखेड राजातील ३ आणि देऊळगाव राजातील १६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांतील आवश्यक जमिनी संपादित करून रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले जाणार आहे.
खामगाव-जालना रेल्वे मार्गामुळे या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. शेतकऱ्यांचा कृषी माल देशातील विविध बाजारपेठांपर्यंत कमी वेळेत पोहोचविणे शक्य होणार असून, उद्योगांना स्वस्त व जलद वाहतुकीची सुविधा मिळेल. तसेच खामगाव आणि जालना दरम्यान थेट रेल्वे संपर्क निर्माण झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार असून, भविष्यात या परिसरात औद्योगिक गुंतवणुकीलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















